बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हिरण्यकेशी नदीत आई व मुलगा बुडाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली.
या घटनेत लक्ष्मी कुठोळी (वय 27) व तिचा 10 वर्षीय मुलगा सुप्रीत कुठोळी यांचा समावेश असून दोघेही स्थानिक रहिवासी होते. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून, मुलगा सुप्रीत नदीत उतरला असताना त्याचा पाण्यावर ताबा सुटल्याने तो बुडू लागला.
मुलाला वाचवण्यासाठी आई लक्ष्मीने तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र, ती मुलाला वाचवू शकली नाही आणि पाण्याच्या प्रवाहात स्वतःही वाहून गेली. या दुर्दैवी घटनेमुळे आई-मुलाचा जीव गेला.
ही घटना संकेश्वर येथील शंकरलिंग मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या हिरण्यकेशी नदीकाठी घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन व आपत्कालीन सेवांच्या पथकाने मंगळवारी उशिरा रात्री लक्ष्मी यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. दरम्यान, सुप्रीतच्या शोधासाठी बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू असून अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही.
या घटनेमुळे संकेश्वर परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.
