कोल्हापूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

कोल्हापूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

बेळगाव, दि. २४ : सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगळे, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आलेल्या या निवेदनात सीमाप्रश्नासंदर्भातील घटनाक्रमाचा तपशील देण्यात आला आहे. निवेदनानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमाभागातील मराठी जनतेच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी १६ जून २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन परवानगीही मागण्यात आली होती.

समितीच्या म्हणण्यानुसार, २० जून रोजी सीमाभागातील कार्यकर्ते व मराठी भाषिक बांधव कोल्हापूरकडे रवाना झाले असता त्यांना विविध ठिकाणी अडविण्यात आले. २० जून रोजी पहाटे बेळगावहून निघालेल्या कार्यकर्त्यांना कर्नाटक हद्दीतील हत्तरगी गावाजवळ कर्नाटक पोलिसांनी अडविले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दिलेले पत्र दाखवून त्यांना ताब्यात घेऊन बेळगावातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, गेली ७० वर्षे सीमाप्रश्नासाठी लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर अशा प्रकारची कारवाई करणे अन्यायकारक असून महाराष्ट्र शासनाने मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन ठोस भूमिका घ्यावी. तसेच कोल्हापूर पोलिसांची ही कृती निषेधार्ह असल्याचे समितीने म्हटले आहे.

२२ जून रोजी बेळगाव येथे झालेल्या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्याचा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 5 =

error: Content is protected !!