मराठी मतदारांची नावे यादीतून गहाळ होऊ देणार नाही; SIR प्रक्रियेत प्रत्येकाने सहभागी व्हावे : प्रकाश मरगाळे

मराठी मतदारांची नावे यादीतून गहाळ होऊ देणार नाही; SIR प्रक्रियेत प्रत्येकाने सहभागी व्हावे : प्रकाश मरगाळे

बेळगाव : मराठी भाषिक मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ होऊ नयेत आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत एकही मराठी मतदार वंचित राहू नये, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत SIR प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्येक भागातील पोलिंग एजंटांची नावे तातडीने समितीकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर अमर येळ्ळूरकर, एम. जी. पाटील, मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील आणि रमाकांत कोंडुस्कर उपस्थित होते.

अमर येळ्ळूरकर यांनी SIR फॉर्म कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि संपूर्ण प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदार पडताळणीच्या वेळी मराठी भाषिकांची नावे गहाळ होणार नाहीत, यासाठी प्रत्येक भागातील पोलिंग एजंटांची नावे लवकरात लवकर समितीकडे जमा करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

रणजीत हावळणाचे यांनी प्रत्येक मराठी भाषिकाचा SIR फॉर्म भरला जाईल, यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सागर पाटील, शुभम शेळके आणि अमित देसाई यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघात अनेक ठिकाणी केवळ कन्नड भाषेतील फॉर्म उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप केला. काही राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी स्वतःचे नाव व छायाचित्र असलेल्या मराठी फॉर्मच्या प्रती नागरिकांकडून भरून घेत असून, त्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतपणे गोळा केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रकाश अष्टेकर यांनी येळ्ळूर परिसरातही अशाच प्रकारे नागरिकांचे मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप केला. यावेळी उपस्थित अनेक मराठी भाषिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “निवडणूक आयोग खरेदी केला आहे का?” असा सवाल उपस्थित केला.

रमाकांत कोंडुस्कर यांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी किचकट असल्याचे सांगितले. मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी दिसत नाहीत; मात्र निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या नावासह मराठी अर्ज वाटून नागरिकांची दिशाभूल करत वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एम. जी. पाटील यांनी SIR प्रक्रियेतून एकही मराठी मतदार वंचित राहू नये, यासाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याचे आवाहन केले.

मालोजीराव अष्टेकर यांनी सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही संबंधित मतदारसंघातील मतदारांची पडताळणी करण्यासाठी असल्याने कोणीही गाफील राहू नये, असे सांगितले. मराठीत फॉर्म उपलब्ध करून घेण्यासाठी लढा सुरू असतानाच प्रत्येक बूथ हा स्वतःचा बूथ समजून कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले.

मदन बामणे यांनी मराठी भाषिक मतदारांना त्यांच्या मातृभाषेत अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची गरज व्यक्त केली. आंध्र प्रदेशातील एका मतदारसंघात मराठी भाषिकांसाठी मराठीत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर सीमाभागातही मराठी अर्ज उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी मराठी भाषेच्या हक्कासाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला. SIR प्रक्रियेबाबत मराठी भाषिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याची आवश्यकता असून प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन नागरिकांना फॉर्म भरण्यास मदत करावी, असे त्यांनी सांगितले.

कुणबी-मराठा जात नोंदणीच्या वेळी ज्या पद्धतीने समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने काम केले, त्याच धर्तीवर आता मतदार पडताळणी प्रक्रियेतही सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मराठी भाषिकाचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि एकही मराठी मतदार वंचित राहू नये, यासाठी SIR प्रक्रियेकडे अत्यंत गांभीर्याने पाहून प्रत्येकाने स्वतःचा सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला नेताजी जाधव, सुधा भातकांडे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, रावजी पाटील, कपिल भोसले, आनंद आपटेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 4 =

error: Content is protected !!