७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी

७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी

तयारी बैठकीत कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर, बेळगाव येथे उत्साहात पार पडणार आहे.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच विविध समित्यांवरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यासाठी नुकतीच डी. बी. पाटील कार्यालयात महिला व पुरुष कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील होते.

यावेळी बोलताना त्यांनी, “हे संमेलन सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ही जबाबदारी स्वतःची समजून काम करावे,” असे आवाहन केले.

संमेलनाचे मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे हे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.

संमेलनात तीन सत्रांमधून विविध साहित्यिक कार्यक्रम रंगणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे हे ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावर गेय काव्य मैफल सादर करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी दिली.

बैठकीत स्वागत, प्रसिद्धी, मंडप व्यवस्था, भोजन व्यवस्था, पाहुण्यांचे आदरातिथ्य आदी विविध समित्यांची आखणी करून कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, खजिनदार एम. वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, स्मिता किल्लेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या साहित्य संमेलनामुळे सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीला वेग आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 − one =

error: Content is protected !!