बेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोप; मराठी भाषिकांत तीव्र नाराजी

बेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोप; मराठी भाषिकांत तीव्र नाराजी

बेळगाव, १३ ऑगस्ट : कर्नाटक सरकारने बेळगाव विभागासाठी जाहीर केलेल्या ८३१ शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमासाठी शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, मराठी, उर्दू आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी शिक्षकांच्या जागांचा कोणताही उल्लेख नसल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे युवा नेते शुभम शेळके यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण अधिकारी (DDPI) कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी कार्यालय अधीक्षक सलीम नदाफ यांची भेट घेतली. यावेळी सदर भरती अधिसूचना सध्या केवळ कन्नड माध्यमासाठी असल्याची माहिती मिळाल्याचे शुभम शेळके यांनी सांगितले.

याबाबत प्रतिक्रिया देताना शुभम शेळके म्हणाले की, मराठी माध्यमातील शिक्षक भरतीकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यास मराठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होईल. मराठीबरोबरच उर्दू व इतर अल्पसंख्याक माध्यमांतील विद्यार्थ्यांनाही याचा गंभीर फटका बसण्याची शक्यता असून, राज्य सरकारने सर्व भाषिक विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा.

या प्रकरणी बंगळुरूहून डीडीपीआयचे वरिष्ठ अधिकारी बेळगावात येणार असून, त्यांच्यासमोर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीची अधिसूचना तातडीने दुरुस्त करून मराठी, उर्दू आणि इतर माध्यमांसाठीही शिक्षकांच्या जागांचा समावेश करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासाठी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता जिल्हा शिक्षण अधिकारी (DDPI) कार्यालयात शिक्षणप्रेमी, पालक, शिक्षक आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शुभम शेळके यांनी केले आहे.

प्रमुख मागण्या

  • ८३१ शिक्षक भरतीची अधिसूचना तातडीने दुरुस्त करावी.
  • मराठी, उर्दू व इतर माध्यमांसाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा.
  • सर्व भाषिक विद्यार्थ्यांना संविधानानुसार समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 2 =

error: Content is protected !!