भुवनेश्वर येथील ऑल इंडिया नेमबाजी स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी

भुवनेश्वर येथील ऑल इंडिया नेमबाजी स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी

१५ वर्षांखालील गटात सुवर्णपदक; स्मरण पैकेकेरीला कांस्यपदक

उचगाव, १३ ऑगस्ट : ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ऑल इंडिया नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथील कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी याने १५ वर्षांखालील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे बसरीकट्टी गावासह आजरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याच स्पर्धेत कु. स्मरण पैकेकेरी याने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदकाची कमाई केली.

प्रज्वल हा बसरीकट्टी गावचा सुपुत्र असून इंडियन आर्मीतील हवालदार लक्ष्मण अनंत हिरोजी यांचा चिरंजीव आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये सरस कामगिरी करत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.

सध्या प्रज्वल दि डायनॅमिक पब्लिक स्कूल, सुळेरान (ता. आजरा, महाराष्ट्र) येथे शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्याने वेगळी ओळख निर्माण केली असून, राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे त्याच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.

प्रज्वलच्या यशामागे प्रशिक्षक दिनेश जाधव आणि सी. एन. खिल्लारे, मुख्याध्यापक संतोष पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय दाभोळे, सचिव चैतन्य दाभोळे, कार्यकारी संचालक अमित पाटील तसेच आजोबा अनंत हिरोजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर चमकदार यश मिळवणाऱ्या प्रज्वल हिरोजी आणि कांस्यपदक विजेता स्मरण पैकेकेरी यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही त्यांनी देशासाठी आणखी मोठी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − seven =

error: Content is protected !!