मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

खादरवाडी येथे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गंगाधर एम. आणि आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर नागेंद्र मडीवाळ यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा, खादरवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजविण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील राष्ट्रीय पंच आणि बेळगाव बॉडीबिल्डिंगचे अध्यक्ष गंगाधर एम. तसेच आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर व मिस्टर इंडिया नागेंद्र मडीवाळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना खेळामुळे जीवनात जिद्द, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या वनश्री नायर आणि क्रीडा शिक्षक अतुल शिरोळे उपस्थित होते. वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू आणि प्राचार्या वनश्री नायर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक अतुल शिरोळे यांनी स्पर्धांचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडाकौशल्य दाखवून दिले. मैदानावरील खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर क्रीडामय झाला होता.

सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 15 =

error: Content is protected !!