युवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मान

युवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मान

सीमालढ्यासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

एकंबा : प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कै. बापूसाहेब एकंबेकर पाटील यांच्या एकंबा गावाला धावती भेट दिली. कोणतीही पूर्वकल्पना न देता झालेल्या या भेटीदरम्यान गावातील प्रमुख कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश वासरे, राम रावणगावे, नारायण पाटील तसेच भागातील ज्येष्ठ समिती कार्यकर्त्यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत व सन्मान केला.

यावेळी शिवस्मारकाला अभिवादन करण्यात आले. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीची माहिती मिळताच अनेक मराठीप्रेमी नागरिक आवर्जून उपस्थित राहिले. अनपेक्षित भेट असूनही ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह आणि आपुलकी यामुळे सीमालढ्याशी त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट असल्याचे दिसून आले.

एकंबा, औराद आणि कमलनगर हा परिसर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या परिसरातील नागरिकांमध्ये आजही सीमालढ्याबद्दलचा जोश, उत्साह आणि तळमळ कायम असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.

यावेळी ग्रामस्थांनी आगामी काळात सीमालढ्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, त्यासाठी आपण सदैव युवा समितीच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. सीमाभागातील मराठी जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी शुभम शेळके यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, “सीमालढा हा केवळ काही व्यक्तींचा नव्हे, तर असंख्य मराठी बांधवांच्या अस्मितेचा आणि हक्काचा लढा आहे. एकंब्यासारख्या बालेकिल्ल्यातील मराठी जनतेचा मिळणारा हा विश्वास आमच्यासाठी मोठी ताकद आहे. येत्या काळात आपण सर्वजण एकत्रितपणे हा लढा अधिक ताकदीने लढू आणि निश्चितच जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला.

एकंबा भेटीदरम्यान झालेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे सीमालढ्याच्या पुढील वाटचालीसाठी युवा समिती आणि स्थानिक समिती कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − ten =

error: Content is protected !!