बेळगाव, दि. १ सप्टेंबर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस आयुक्तालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगमन सोहळा, गणेश चतुर्थी तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
भेटीदरम्यान पोलीस आयुक्त श्री. बोरसे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेळगावमधील विविध गणेश मंडळांनी आतापर्यंत केलेल्या शिस्तबद्ध आणि उल्लेखनीय कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
गणेशोत्सवाचे नियोजन अधिक प्रभावी आणि शांततेत पार पाडण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला डीसीपी नारायण बर्मनी, माजी आमदार अनिल बेनके तसेच ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, सुरक्षा व्यवस्था आणि उत्सवाच्या विविध नियोजनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे.
या सदिच्छा भेटीवेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष उमेश मनसे, कार्यवाह निखिल पाटील, खजिनदार ऋषभ मोहिते, तसेच गणेश मोहिते, हरीश तहसीलदार आणि मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
