अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता २८ सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी

अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता २८ सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी

बेळगाव : शिक्षण विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर २०२६, शुक्रवारपासून सहामाही/मध्यावधी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलून सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक कुटुंबांमध्ये ११ दिवस गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. शहरातील विविध गणेश मंडळांकडून यावेळी मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका काढल्या जातात.

विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी तसेच त्यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थी आणि पालकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. विविध भागांत मिरवणुकांमुळे मोठी गर्दी निर्माण होते आणि वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवशी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करताना अडचणी निर्माण होण्याबरोबरच परीक्षेच्या वेळीही गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे समितीने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तसेच कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे निवेदन सादविले आहे. २५ सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलून २८ सप्टेंबर रोजी घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच गणेश विसर्जनाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शिक्षण विभागाने या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + twelve =

error: Content is protected !!