बेळगाव : दसऱ्याच्या सुटीचा आनंद घेतानाच बालगोपालांच्या श्रवण, वाचन, आकलन आणि बोलण्याच्या कौशल्यांना अधिक धारदार करण्यासाठी लोकमान्य ग्रंथालयाच्या वतीने ‘गोष्टींचा बडबडबाजा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ३ ऑक्टोबरपासून शाळांना दसऱ्याची सुटी सुरू होत आहे. या सुटीचा सर्जनशील आणि शैक्षणिक उपयोग व्हावा, या उद्देशाने लोकमान्य ग्रंथालयातर्फे खास बालगोपालांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुदानांतर्गत आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम पुण्याच्या तज्ज्ञ प्रदन्या वझे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
सोमवार, ५ ऑक्टोबर ते शनिवार, १० ऑक्टोबर या कालावधीत सलग सहा दिवस सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत येथील वरेरकर नाट्य संघाच्या आर्ट गॅलरीमध्ये ‘गोष्टींचा बडबडबाजा’ रंगणार आहे.
मराठी आणि इंग्रजी माध्यमातील ७ ते १३ वर्षे वयोगटातील म्हणजेच इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालगोपालांना या शिबिरात विनामूल्य सहभागी होता येणार आहे.
या सहा दिवसीय उपक्रमात प्रसंग कथन, कथा वाचन, कथा लेखन, कथा कथन, कविता समजून घेणे, कविता गायन आणि गोष्टी सांगणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. मजेदार आणि सहभागी कृती सत्रांच्या माध्यमातून मुलांच्या भाषिक कौशल्यांना चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत लोकमान्य ग्रंथालयात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रंजनाताई – 8050479148 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
