महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा गरजेच्या – मालोजीराव अष्टेकर

बेळगाव, ता. १२ : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वरेरकर नाट्य मंदिर येथे आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांतील एकूण ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

वक्तृत्व स्पर्धांमुळे भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडण्यास मदत होते. आजच्या काळात अशा स्पर्धांचे आयोजन करणे ही गरज आहे. स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचे कौतुक करणे आवश्यक आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यामुळे सीमाभागात मराठी भाषेसाठी विविध उपक्रम राबविण्यास बळ मिळत आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समितीचे नेते रमेश पावले आणि रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते, तर हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. महेश बिर्जे आणि समितीचे नेते मदन बामणे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, सी.ए. सोमशेखर सुतार, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, शिवराज पाटील, अमित देसाई, प्रशांत भातकांडे, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील आणि सुहास हुद्दार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत प्राथमिक गटात ४०, माध्यमिक गटात ३० आणि महाविद्यालयीन गटात २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रा. परसु गावडे, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्रा. सुरेश पाटील, वाय. पी. नाईक, बसवंत शहापूरकर, प्रा. सोनाली कांगले आणि प्रा. सुनीता कणबरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेतील विजेते

प्राथमिक गट : प्रथम क्रमांक अथर्व विठ्ठल गुरव (मराठी विद्यामंदिर, तडशिनहाळ), द्वितीय भूमी म्हात्रू भातकांडे (बालिका आदर्श), तृतीय अदिती दिनकर परमोजी (मराठी विद्यानिकेतन), चतुर्थ भावेश संतोष चोपडे (सरकारी मराठी प्राथमिक शाळा, इदलहोंड) आणि पाचवा क्रमांक शौर्य शिवाजी अंबुलकर (व्ही. डी. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज) यांनी मिळविला.

माध्यमिक गट : प्रथम सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव), द्वितीय क्रांती मारुती पाटील (जनता विद्यालय, तुर्केवाडी), तृतीय साईराज राम गुरव (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव), चतुर्थ वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर) आणि पाचवा क्रमांक पूर्वी रमेश घाडी (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर) यांनी पटकाविला.

महाविद्यालयीन गट : प्रथम आरती गोरल (भाऊराव काकतकर महाविद्यालय, बेळगाव), द्वितीय अनुजा लोहार (कला व वाणिज्य महाविद्यालय, कोवाड-चंदगड) आणि तृतीय सानिका कांबळे यांनी क्रमांक मिळविले. भावना पाटील (बेळगाव), प्रांजली मारुती कणबरकर (आर.पी.डी. महाविद्यालय) आणि अश्विनी गावकर (मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, बेळगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देण्यात आले. मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, डी. बी. पाटील, अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री, किरण धामणेकर, सागर पाटील, बाळू गोरल, युवराज पाटील आणि महेश गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, चिटणीस प्रतीक पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × one =

error: Content is protected !!