बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना १ जून रोजी कन्नड सक्तीविरोधी लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
बैठकीत कन्नड सक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राबविण्यात येणाऱ्या एक लाख सह्यांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व नागरिकांनी १ जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे, तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या दिवशी मोर्चाचे आयोजन करेल त्या मोर्चातही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस सरचिटणीस मनोहर हुंदरे, पिराजी मुंचडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुंचडीकर, मोतेस बारदेसकर, सुधीर शिरोळे, सचिन दळवी, रमेश माळवी, सूरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, निलेश काकतकर, राजू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
