पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पुढाकार
पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किल्ले प्रतापगड येथे सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी तुळजाभवानी मंदिरात पूजा, आरती व प्रार्थना करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घालण्यात आले. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने किल्ले प्रतापगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. यावेळी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी सांगण्यात आली. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेदरम्यान सीमाभागावर झालेला अन्याय तसेच सीमावासीयांच्या विविध प्रश्नांबाबत माहिती देण्यात आली. सीमाभागातील भाषिक प्रश्न, आंदोलनांदरम्यान दाखल झालेले गुन्हे आणि सीमावासीयांच्या मागण्यांविषयीही उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे वाई तालुका अध्यक्ष प्रताप जाधव यांनाही सीमावासीयांच्या प्रश्नांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील जनता आणि राजकीय नेत्यांना सीमाप्रश्नाबाबत जागृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.
तसेच बेळगावातील १९८६ च्या कन्नडसक्तीविरोधी आंदोलनात सहभागी होऊन तुरुंगवास भोगलेले वाई येथील प्रसिद्ध मिसळ जॉली हॉटेलचे ८० वर्षीय मालक मनोहर त्रिंबक पटवर्धन यांचीही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
यावेळी पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे विश्वनाथ पाखरे, अजित कुमठेकर, रामदास पाखरे, पंकज दास, नागराज पाखरे, जगन्नाथ, रवी यांच्यासह अनेक पर्यटक उपस्थित होते.
