बेळगाव : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी लोकमान्य ग्रंथालयातर्फे यंदापासून साहित्य पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षासाठी चार साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
बेळगाव आणि परिसरातील विविध साहित्य प्रकारांत साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समितीने प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. द. तु. पाटील आणि श्रीमती पूजा भडांगे यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालयात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक येथील ज्येष्ठ विचारवंत, संपादक आणि लेखक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवयित्री डॉ. मंगला वरखेडे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास बेळगावातील साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
