बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष के. एल. मजूकर होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात के. एल. मजूकर यांनी ‘कॉनस्टँटिनोपलचा पाडाव’ या ऐतिहासिक घटनेचे सविस्तर वर्णन केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच त्यांनी दोन गाणी सादर करून आपल्या कलागुणांचेही दर्शन घडविले.

कार्यक्रमाची सुरुवात अनंत सावंत यांच्या प्रार्थनेने झाली. यानंतर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, भारती गावडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, विजय बांदिवडेकर, प्रभाकर देसाई, राजेंद्र कर्नाटकी, वसंत पाटील व विजयमाला पाटील यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर केली. भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवराज पाटील यांनी केले.
