एसआयआर सर्वेक्षणातील बीएलओ व बीएलए यांच्या अडचणींबाबत किरण जाधव यांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा

एसआयआर सर्वेक्षणातील बीएलओ व बीएलए यांच्या अडचणींबाबत किरण जाधव यांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा

बेळगाव, १८ जुलै : विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR) सर्वेक्षणादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी लोकसभेचे खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या भेटीत किरण जाधव यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामात येणाऱ्या अडचणी, नागरिकांशी समन्वय साधताना निर्माण होणाऱ्या समस्या तसेच सर्वेक्षण सुरळीत आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती खासदार शेट्टर यांच्यासमोर मांडली. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत बीएलओ आणि बीएलए यांच्या न्याय्य अडचणी शासन व संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, एसआयआर सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व बीएलओ आणि बीएलए यांच्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी हनमंत कागलकर, राजन जाधव, गणेश देढे, पार्थ भोसले आणि विनायक शिनगावकर उपस्थित होते.

या बैठकीमुळे एसआयआर सर्वेक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील आणि बीएलओ व बीएलए यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!