बेळगाव येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भव्य हॉकी मैदान साकारणार; खासदार जगदीश शेट्टार यांची ग्वाही

बेळगाव येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भव्य हॉकी मैदान साकारणार; खासदार जगदीश शेट्टार यांची ग्वाही

बेळगाव, २५ जून : हॉकीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहरात पुन्हा एकदा हॉकीचा सुवर्णकाळ परत आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या पुढाकाराने आज खासदार जगदीश शेट्टार आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचनवार यांच्यासोबत सकारात्मक बैठक पार पडली.

सकल मराठा समाजाचे नेते तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘हॉकी बेळगाव’च्या पदाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. यावेळी बेळगावमधील हॉकी मैदानाच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान खासदार जगदीश शेट्टार यांनी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून या प्रकल्पासाठी विशेष निधी आणि आवश्यक मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच या प्रस्तावाचा दिल्ली पातळीवर स्वतः पाठपुरावा करून बेळगावमध्ये आधुनिक आणि भव्य हॉकी मैदान उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचनवार यांनीदेखील खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन या प्रस्तावाला गती देण्याचे आश्वासन दिले. मैदान उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यकारी अभियंता सतीश मनोलकर उपस्थित होते.

बैठकीस ‘हॉकी बेळगाव’चे पदाधिकारी गोळाप्पा होसमणी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश बेळगोजी, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, सागर पाटील, कविता वेसणे यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

नेते किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘हॉकी बेळगाव’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बेळगावच्या मातीतून पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू घडावेत, यासाठी हे प्रस्तावित मैदान महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

error: Content is protected !!