बेंगळुरू/बेळगाव, 25 जून : राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागातील कथित भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत बेळगाव, बेंगळुरू आणि म्हैसूर येथील 14 ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत तब्बल 13.3 कोटी रुपयांची मालमत्ता, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ईडीच्या माहितीनुसार, कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. विविध मद्य परवान्यांच्या मंजुरी, नूतनीकरण आणि स्थलांतर प्रक्रियेसाठी लाच स्वीकारल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर आहे.
तपासादरम्यान उत्पादन शुल्क विभागात संघटित पद्धतीने भ्रष्टाचाराचे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. विविध मद्यविक्री केंद्रांकडून दरमहा निश्चित रकमेची लाच गोळा केली जात होती. ही रक्कम मध्यस्थांच्या माध्यमातून जमा करून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वाटली जात असल्याचा आरोप आहे.
ईडीच्या तपासात काही अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील संस्थांच्या नावावर मद्य परवाने मिळवून व्यवसाय चालविल्याचेही उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वैध व्यवसायातील उत्पन्न म्हणून दाखवून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.
या कारवाईत उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी जगदीश नायक, के. एम. थम्मन्ना आणि वाय. डी. मंजुनाथ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या व व्यावसायिक सहकाऱ्यांच्या ठिकाणांची झडती घेण्यात आली.
छापेमारीदरम्यान डिजिटल उपकरणे, कथित लाचवाटपाची रोकड नोंदवही, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. तसेच सुमारे 5.5 कोटी रुपयांची रोख रक्कम, 7.8 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 3.3 लाख रुपयांचे परकीय चलन हस्तगत करण्यात आले आहे.
ईडीने या प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
