खानापूरच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात कै. पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन!

खानापूरच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात कै. पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन!

यूपीएससी, एमपीएससी, केपीएससी, केएएससह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा; मान्यवरांकडून पुस्तकांची देणगी

खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पुण्याचे नामवंत वास्तुविशारद पीटर डिसोझा, गर्लगुंजी गावचे उच्चविद्याविभूषित समाजसेवक प्रसाद विठ्ठल पाटील आणि संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातून आलेल्या शेकडो पालकांच्या उपस्थितीत हे केंद्र विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात आले.

मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यूपीएससी, एमपीएससी, केपीएससी, केएएस, बँकिंग तसेच अग्निवीर आणि एअर फोर्स यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची पायाभरणी विद्यार्थ्यांना योग्य वयात करता यावी, हा या केंद्रामागील मुख्य हेतू आहे.

मोबाईलचा अनावश्यक वापर आणि त्याचे आकर्षण टाळून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, या उद्देशाने केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी दर्जेदार पुस्तके आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे, मुंबई आणि बेंगळूर येथे उपलब्ध असणाऱ्या ज्ञानसंपदेचा लाभ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळावा यासाठी पुण्यातील व्यावसायिक शिवानंद चन्नेवाडकर आणि वास्तुविशारद पीटर डिसोझा यांनी विशेष योगदान दिले आहे. तसेच समाजसेवक प्रसाद पाटील यांनी या केंद्रासाठी २५ हजार रुपयांची पुस्तके व इतर स्पर्धा परीक्षा साहित्य देण्याची घोषणा केली.

या ग्रंथालयात Word Power Made Easy, माझी पदवी माझे करिअर, Coding, General English, GK 2027, General Knowledge, NCERT पुस्तक संच, तात्याचा ठोकळा, प्रतियोगिता दर्पण, व्हिझार्ड यांसारखी पुस्तके तसेच विविध दर्जेदार साप्ताहिके, मासिके आणि शेकडो संदर्भग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनागीताने झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा परीक्षा केंद्राची संकल्पना आणि त्यामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुणे पीटर डिसोझा, प्रसाद पाटील आणि शिवाजीराव पाटील यांचा प्राध्यापक व पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशाची पाच सूत्रे आत्मसात करा : पीटर डिसोझा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीटर डिसोझा यांनी जीवनात पालक आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या विचाराचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञान, मदत आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण समाजाला समृद्ध बनवते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी श्रद्धा, जीवनाचे ध्येय, कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही यशाची पाच सूत्रे आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक : प्रसाद पाटील

प्रसाद पाटील यांनी यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, तयारीची पद्धत आणि प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता आणि कमतरता ओळखून उपलब्ध संधी व संभाव्य आव्हानांचा विचार करत अभ्यासाचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. नियमित पुस्तक वाचन, वृत्तपत्रांचा अभ्यास आणि चालू घडामोडींचे ज्ञान यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अरविंद पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, अभ्यासाचे पोषक वातावरण आणि मार्गदर्शन महाविद्यालयातच उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेऊन आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी वाणिज्य विभागाचे प्रा. पी. व्ही. कर्लेकर आणि प्रा. एम. वाय. देसाई यांनी स्वीकारली आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक सक्षमपणे तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेले हे स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे आणि प्रशासकीय सेवेकडे जाणाऱ्या त्यांच्या वाटचालीला बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व स्तरावर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची ओळख आणि तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

कार्यक्रमाला संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील, प्रा. टी. आर. जाधव, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. वनिता गवाडे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − three =

error: Content is protected !!