खानापूर : सावरगाळी (ता. खानापूर) येथील सूनबाई तथा निप्पाणी येथील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. सुनीता गं. राक्षे-गुरव यांना कर्नाटक विद्यापीठ, धारवाडकडून डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
“खानापूर तालुक्यातील लोककलांवर गोमंतकाचा प्रभाव : एक तुलनात्मक अभ्यास” या विषयावरील त्यांच्या संशोधनाला विद्यापीठाने मान्यता दिली. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी खानापूर तालुक्यातील लोकसंस्कृती, सण-उत्सव, लोकनृत्य, लोकनाट्य, लोककथा, पारंपरिक खेळ, बोलीभाषा आणि लोकगीतांचा सखोल अभ्यास करून तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण केले.
तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन स्थानिक कलावंतांशी संवाद साधत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली. या संशोधनकार्याला मार्गदर्शक म्हणून डॉ. यशवंत राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कुलगुरू डॉ. एम. सी. सुधाकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. राक्षे-गुरव यांच्या या उल्लेखनीय यशामुळे खानापूर तालुक्याचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
