बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या कवितांवर आधारित ‘कळा या लागल्या जीवा’ या विशेष कार्यक्रमाचे तसेच खुल्या कवी संमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात करण्यात आले आहे.
चंद्रशेखर गायकवाड हे गेली अनेक वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी कविता, कथा तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही लेखन केले आहे. त्यांचा ‘कळा या लागल्या जीवा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्यांना खानापूर येथील निसर्ग साहित्य संमेलनाचा कै. प्रा. वसंत कुलकर्णी काव्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध नियतकालिकांमधून त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या असून बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
गोवा येथे आयोजित विश्वविक्रमी ‘काव्यहोत्र’ कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच पुणे, परभणी, रायगड आणि सातारा येथील विविध कवी संमेलनांमध्ये त्यांनी काव्यवाचन करून रसिकांची दाद मिळवली आहे.
या कार्यक्रमामध्ये कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या साहित्यिक प्रवासाचा वेध घेतला जाणार असून त्यांच्या भावस्पर्शी कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक कवींकरिता खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.
