बेळगाव, दि. २७ ऑगस्ट २०२६: एका पीआयडी (PID) नंबरवर केवळ एकच नळ जोडणी देण्याची अट तातडीने रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या विविध पाणीपुरवठा समस्यांबाबत बेळगाव महानगरपालिकेकडे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी श्री रमाकांत दादा कोंडुसकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजतकर, राजू बिरजे, विकास कलघटगी, प्राचार्य आनंद आपटेकर, सुनील बोकडे, प्रसाद मरगाळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिकेला सादर करण्यात आलेल्या निवेदनात एका पीआयडी नंबरवर एकच नळ जोडणी देण्याची अट नागरिकांसाठी जाचक व अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच घरात किंवा एकाच पीआयडी अंतर्गत स्वतंत्रपणे अनेक कुटुंबे वास्तव्यास असून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी स्वतंत्र नळ जोडणीची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, ज्या नागरिकांकडे जुन्या नियमांनुसार एकाच पीआयडी नंबरवर दोन ते तीन स्वतंत्र नळ जोडण्या मंजूर आहेत, त्या जोडण्या कोणत्याही अडथळ्याविना नियमित सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव महानगरपालिका ही जनतेच्या सोयीसाठी व कल्याणासाठी कार्यरत असल्याने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन संबंधित एल अँड टी (L&T) कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागण्यांवर महानगरपालिकेकडून सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
