कंग्राळी खुर्द येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 40 हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग

कंग्राळी खुर्द येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 40 हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग

कंग्राळी खुर्द : जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कंग्राळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 40 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत प्राथमिक मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन एसडीएमसी अध्यक्ष विक्रम मुतगेकर, पीडीओ गोपाळ नाईक, माजी सदस्य प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी, डॉ. नागेंद्र, श्रीमती एस. व्ही. तोरगल तसेच आशा कार्यकर्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे नमूद करत अधिकाधिक पात्र नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. शिबिरात संकलित होणारे रक्त विशेषतः गर्भवती महिलांच्या उपचारांसाठी उपयोगी पडत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. गावातील युवक मंडळांचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे सदस्य तसेच कंग्राळी, अलतगा आणि अगसगा परिसरातील नागरिकांनी राष्ट्रीय सेवाभाव जपत रक्तदान केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योती महेंद्रकर, रेणुका होनगल, श्रीमती महादेवी, रुद्रव्वा यांच्यासह कंग्राळी व अलतगा येथील आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र हंदिगनूर, उपकेंद्र कंग्राळीचे डॉक्टर व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गरजेच्या वेळी लाभ मिळू शकेल, अशी माहिती देत त्यांचे आभार मानण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 5 =

error: Content is protected !!