ऑटोनगर, रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी द्या : किरण जाधव

ऑटोनगर, रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी द्या : किरण जाधव

बेळगाव : उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली आहे.

मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री वर्मा यांची भेट घेऊन जाधव यांनी निवेदन सादर केले. ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये शेकडो लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत असून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र वाढत्या औद्योगिक विस्ताराच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसल्याने उद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे आधुनिकीकरण, सुसज्ज जलनिस्सारण व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यावरील दिवे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, यासाठी केंद्र सरकारकडून विशेष योजना व निधी मंजूर करण्याची मागणी जाधव यांनी केली.

यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले की, बेळगाव हे देशातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक असून येथील फाउंड्री, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आल्यास नवीन गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी औद्योगिक विकासाशी संबंधित विषय गांभीर्याने विचारात घेतला जाईल. संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी मुक्तियार पठाण, स्थानिक उद्योजक तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + five =

error: Content is protected !!