बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), बेळगावच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरासह संपूर्ण परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिरासमोर तसेच मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या पटांगणात भाविकांसाठी भव्य मंडप उभारण्यात आले होते.
उत्सवाची सुरुवात पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने झाली. त्यानंतर तुलसी आरती, जप आणि गुरु आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरी केशव प्रभू यांनी श्रीमद् भागवताचे प्रवचन केले. त्यांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंधातील श्लोकांचे पठण करून त्यांचा भावार्थ सांगितला. “भगवंत कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी श्रीमद् भागवत आहे. भगवंताचे स्वरूप हे जगाचे मंगल व कल्याण करणारे आहे,” असे त्यांनी सांगितले.
दिवसभर मंदिर परिसरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी पाच वाजल्यानंतर दीक्षित भक्तांकडून भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करण्यात आला. अभिषेकासाठी मंडपात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी मंडपाच्या बाजूला भगवान जगन्नाथ, बलदेव-सुभद्रा, गौर-निताई तसेच राधा गोकुळानंद यांचे अर्चाविग्रह ठेवण्यात आले होते. भाविकांनी या विग्रहांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरातील भक्तांनी सादर केलेली नाट्यलीला उपस्थितांचे आकर्षण ठरली.
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष कृष्णकथा कथन झाले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती.
आज श्रील प्रभुपाद अविर्भाव दिन
दरम्यान, शनिवारी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये श्रील प्रभुपादांचा गुणगौरव, अभिषेक, प्रभुपादांची आरती तसेच फुलांचा अभिषेक करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
