प्रेयसीसोबत संसार करण्यासाठी पत्नीची निर्घृण हत्या; अपघाताचा बनाव उघड

प्रेयसीसोबत संसार करण्यासाठी पत्नीची निर्घृण हत्या; अपघाताचा बनाव उघड

बेळगाव, प्रतिनिधी : प्रेयसीसोबत राहण्याच्या उद्देशाने पत्नीची हत्या करून ती अपघातात मृत्युमुखी पडल्याचा बनाव रचणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना गोकाक तालुक्यातील शिंदीकुराबेट गावात उघडकीस आली आहे.

मृत महिलेचे नाव सक्कुबाई पाटायत असे असून, तिचा पती संतोष पाटायत यानेच तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोषचे आपल्या गावातील एका विधवा महिलेसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत राहण्याच्या हेतूने त्याने पत्नीचा काटा काढण्याचा कट रचला.

अधिक मास सुरू असल्याचे सांगून संतोषने पत्नी सक्कुबाई यांना बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी नेले होते. दर्शन करून परत येत असताना त्याने शीतपेयामध्ये उंदराचे विष आणि बांगडीची पूड मिसळून ते प्रसाद असल्याचे सांगत पत्नीला पाजले. विषाचा परिणाम होऊन सक्कुबाई बेशुद्ध पडू लागल्यानंतर संतोषने रस्त्याच्या कडेला तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेहावर मोटारसायकल टाकून तो रस्ते अपघात असल्याचा बनाव रचला. काही तास घटनास्थळी थांबल्यानंतर त्याने स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून अपघाताची माहिती दिली.

मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेत (BIMS) करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू हा अपघाती नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संतोषने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

सध्या आरोपी संतोष पाटायत याला अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच त्याच्या प्रेयसीचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

#Gokak #CrimeNews #MurderCase #KarnatakaNews

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

error: Content is protected !!