‘शब्दांच्या पाऊलखुणा’ काव्यकार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : मानवी भावना, नातेसंबंध, सामाजिक जाणीव, गावाशी असलेले नाते आणि मराठी भाषेविषयीची आत्मीयता अशा विविध विषयांवरील कविता सादर करत कवी गुरुनाथ किरमटे यांनी उपस्थित रसिकांना भावविश्वाची अनोखी सफर घडवली.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्यावतीने रविवारी (दि. २२) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमांतर्गत ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर गायकवाड यांनी केले. शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी गुरुनाथ किरमटे यांचा परिचय करून दिला.
‘मनास करते शब्दांच्या हवाली, तेव्हा स्फुरते कविता, भावनांना शब्दात गुंफितो आणि जन्मते कविता’ या ओळींतून आपल्या काव्यलेखनाची भूमिका स्पष्ट करत गुरुनाथ किरमटे यांनी ‘स्वानुभव’, ‘अशी जन्मते कविता’, ‘संयमी मन’, ‘सांजवेळ’, ‘भावनांचे बाहुपाश’, ‘नाळ’, ‘मर्म’, ‘उतरंड’, ‘मराठीचा सेवेकरी’ आणि ‘आशा संपत नाही’ आदी कविता सादर केल्या.
त्यांच्या कवितांमधून मानवी मनातील भावनिक गुंतागुंत, नात्यांमधील ओलावा, जीवनातील संघर्ष, बदलती सामाजिक परिस्थिती, गावाकडच्या आठवणी आणि मराठी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे व्यक्त झाले. ‘नाळ’ या कवितेतून गावाशी असलेले भावनिक नाते, तर ‘मराठीचा सेवेकरी’ या कवितेतून मराठी भाषा व साहित्याविषयीची आत्मीयता प्रकट झाली. ‘आशा संपत नाही’ या कवितेतून माणुसकी आणि मानवी संवेदनांचे महत्त्व अधोरेखित झाले. साधी-सहज भाषा आणि अनुभवांची प्रामाणिक अभिव्यक्ती हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक कवितेला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मुख्य काव्यकार्यक्रमापूर्वी आयोजित कवी संमेलनात दत्ता घोडके, भरत गावडे, स्नेहल बर्डे, जोतिबा नागवडेकर, स्मिता पाटील, कृष्णा पारवाडकर, रोशनी हुंदरे, मधू पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, प्रा. शुभदा खानोलकर, अक्षता येळूरकर, अपर्णा पाटील, अशोक सुतार आणि किरण पाटील आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोक आलगोंडी यांनी ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत गुरुनाथ किरमटे यांच्या कवितांची वैशिष्ट्ये अधोरेखित केली.
यावेळी गुणवंत पाटील, डी. बी. पाटील, निळूभाऊ नार्वेकर, शिवाजी शिंदे, शिवराज पाटील, दीपक किल्लेकर यांच्यासह साहित्यप्रेमी, कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर गावडे यांनी केले, तर आभार भरत गावडे यांनी मानले.
मराठी कविता आणि कवींच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
