गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या गुड्स शेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना योग्य ड्रेनेज व्यवस्था उभारावी, अशी मागणी करत खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देण्यात आले आहे.

गुड्स शेड रोड हा दक्षिणेकडील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासाठी महत्त्वाचा जोडरस्ता असून, शहापूरसह दक्षिण बेळगाव आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, रुग्णवाहिका तसेच दररोजच्या प्रवाशांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः डेccan हॉस्पिटलजवळील न्यू गुड्स शेड रोड आणि बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिज परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. एल अँड टीच्या कामानंतर रस्त्याची स्थिती आणखी बिघडल्याचा दावा करण्यात आला आहे. पावसाळ्यात बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवरून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य ड्रेनेज गटर्स बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी 10 जून 2026 आणि 3 जुलै 2026 रोजी बेळगाव शहर महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून महापालिकेला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात केवळ दगडी भुकटी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र काही दिवसांतच रस्ता पुन्हा खड्डेमय होत असल्याने कायमस्वरूपी रस्ता बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. खराब रस्त्यामुळे नागरिकांना किरकोळ अपघात व दुखापतींचा सामना करावा लागत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरही या रस्त्याचे महत्त्व वाढले आहे. कपिलेश्वर विसर्जन तलावाची क्षमता पूर्ण झाल्यानंतर अनेक गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहने रामतीर्थ विसर्जन तलावाकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आगामी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप ठोस काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

त्यामुळे खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून गुड्स शेड रोडची पाहणी करून कायमस्वरूपी डांबरीकरण, रस्ता सुधारणा आणि दोन्ही बाजूंना ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − one =

error: Content is protected !!