घुमटमाळ मारुती मंदिर व बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

घुमटमाळ मारुती मंदिर व बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

बेळगाव, दि. २६ : “मुलींनो, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा. आपल्या आई-वडिलांची मान खाली झुकणार नाही, असेच वागा. आत्मविश्वास, शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन, एकाग्रता, गुरुनिष्ठा आणि चांगली संगत या गुणांच्या बळावरच आयुष्यात मोठे यश मिळते,” असे प्रतिपादन सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी केले.

येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि कै. बी. के. बांडगी शैक्षणिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमिक शाळांमधील दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. स्वरूपा इनामदार उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कडोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप भेकणे होते. व्यासपीठावर रघुनाथ बांडगी, मंदिराचे उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी आणि सचिव अनंत लाड उपस्थित होते.

बेळगाव तालुक्यातील विविध शाळांतील २५ हून अधिक गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी रु. १,५०० रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, वह्या आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मनस्वी केदार बांडगी यांनी स्वागतपर भाषणाने केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन, तर प्रकाश कडोलकर यांच्या हस्ते स्वर्गीय बी. के. बांडगी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी किशोर काकडे (काकडे फाउंडेशन) यांनी विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन केले.

आपल्या प्रेरणादायी भाषणात प्रा. स्वरूपा इनामदार पुढे म्हणाल्या, “ज्या मारुती मंदिरात तुमचा सन्मान होत आहे, तो मारुती पराक्रमी योद्धा आणि संस्कृतचा अभ्यासक होता. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन जीवन उज्ज्वल करा. महान व्यक्तींची चरित्रे वाचा. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच यश मिळते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे नम्रता, उत्तम चारित्र्य, प्रामाणिकपणा, विश्वास आणि सतर्कता हे गुण आत्मसात केल्यास जीवन निश्चितच उज्ज्वल होईल.”

प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला. त्यांनीच सूत्रसंचालनाची जबाबदारीही पार पाडली. नेताजी जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास बाबुराव पाटील, चंद्रकांत बांडगी, संभाजी चव्हाण, सुनील सरनोबत यांच्यासह रमेश कुकडोळकर, प्रभाकर पाटील, मनोहर कुकडोळकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + eight =

error: Content is protected !!