मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम; ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव
बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेच्यावतीने दीपावली मिलन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. स्नेह, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला दक्षिण भारत विभागीय अध्यक्ष राजन वालियाथन, मृदुला वालियाथन, कर्नाटक राज्य प्रभारी सुहास चांडक आणि हुबळी येथील उदय रेवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम्ने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बेळगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य व्ही. एन. जोशी यांच्या हस्ते राजन वालियाथन यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वालियाथन यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना भारत विकास परिषदेच्या सेवाकार्याची उद्दिष्टे अधिक समर्पणाने पूर्ण करण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्य प्रभारी सुहास चांडक यांनी परिषदेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील निःस्वार्थ राष्ट्रसेवेचे महत्त्व विशद केले.
यावेळी दक्षिण भारत क्षेत्रस्तरीय राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षिका अक्षता मोरे यांचा राजन वालियाथन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यानंतर संस्कार भारतीच्या सुंदर रांगोळीभोवती उपस्थितांनी दीपप्रज्वलन करून दीपावलीचा मंगलमय उत्सव साजरा केला. त्यानंतर गीत-संगीताचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. प्रा. अरुणा नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर, दक्षिण भारत सेवाप्रमुख पांडुरंग नायक, प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर, डॉ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, रामचंद्र तिगडी, रफीक हिराणी, के. वासुदेव प्रभू, डी. वाय. पाटील, पी. जे. घाडी, महिला प्रमुख सुखद देशपांडे, जया नायक, लक्ष्मी तिगडी, ज्योती प्रभू, शालिनी नायक, नंदिता, ज्योत्स्ना गिलबिले, मंगल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दीपावली मिलन सोहळा स्नेह, एकता, बंधुभाव आणि संघटनात्मक एकजुटीचा सुंदर संगम ठरला.
