दसरा सुट्टीत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांवर कारवाईची मागणी

दसरा सुट्टीत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांवर कारवाईची मागणी

बेळगाव : कर्नाटक सरकारने ३ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना दसरा सुट्टी जाहीर केली असताना, काही खासगी शिक्षण संस्था या कालावधीत शाळा सुरू ठेवून परीक्षा व शैक्षणिक उपक्रम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा श्रीराम सेनेने केला आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या बेळगाव येथील उपसंचालकांना निवेदन देण्यात आले असून, शासनाने घोषित केलेल्या सुट्टीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दसरा हा कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक सण असून, सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा आणि सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेता यावा, हा सुट्टीमागील उद्देश आहे. मात्र, या कालावधीत परीक्षा किंवा नियमित शैक्षणिक उपक्रम घेतल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक व परीक्षेचा ताण निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे शासनाच्या सुट्टीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे.

सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्था, परीक्षा घेणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांना अनिवार्यपणे शाळेत बोलावणाऱ्या संस्थांची चौकशी करून शासनाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना शासनाच्या सुट्टीच्या आदेशाची माहिती देऊन त्याचे पालन करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 16 =

error: Content is protected !!