बेळगाव येथील कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन (टर्म 2026-28) चा पदग्रहण समारंभ बुधवारी (दि. 29 एप्रिल) सायंकाळी हॉटेल वूडरोझ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. अमर ब्यकोडी आणि इंजि. किरण माळी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर अध्यक्ष इंजि. रमेश, सचिव इंजि. वीरेश शेट्टण्णावर आणि कोषाध्यक्ष चंद्रकांत यांच्यासह मान्यवरांनी व्यासपीठावर स्थान ग्रहण केले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट, असोसिएशनचा इतिहास आणि प्रायोजकांची माहिती कार्यक्रमाध्यक्ष इंजि. संतोष जावळकर यांनी मांडली.
प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोकंट्रोल्स एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक धाडोटी उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून करहाडकर स्टील्सचे श्री अमोघ करहाडकर यांनी हजेरी लावली. दोन्ही मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

दीपप्रज्वलन व भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. अध्यक्ष इंजि. रमेश तुबाची यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख पीपी इंजि. आनंद कुलकर्णी यांनी करून दिली, तर अतिथींची ओळख इंजि. मल्लिकार्जुन पाटील यांनी करून दिली.
सचिव इंजि. वीरेश शेट्टण्णावर यांनी मागील दोन वर्षांचा अहवाल सादर केला. यानंतर नवीन अध्यक्ष म्हणून इंजि. अजय पाटील, तसेच सचिव व कोषाध्यक्ष यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा पार पडला. नव्या अध्यक्षांनी संचालक मंडळाची घोषणा केली व त्यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन अध्यक्ष इंजि. अजय पाटील यांनी आपल्या मनोगतात आगामी काळातील योजना आणि उद्दिष्टे मांडली. यावेळी कोटी स्टील्सकडून तांत्रिक सादरीकरणही करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री दीपक धाडोटी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संधी व आव्हानांवर प्रकाश टाकला, तर अतिथी श्री अमोघ करहाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवस साजरे करणे व विविध घोषणा करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी इंजि. राजकुमार होंगल यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या समारंभास असोसिएशनचे सदस्य, अभियंते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
