जायंट्स सखीचा अवयवदान जनजागृती उपक्रम उत्साहात

जायंट्स सखीचा अवयवदान जनजागृती उपक्रम उत्साहात

बेळगाव :
जायंट्स सखीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी उद्यान येथे आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमातून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी प्रास्ताविकात अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करत, अनेक रुग्णांना वेळेवर अवयव न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात, ही गंभीर बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.

या प्रसंगी केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजकुंवर देसाई या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि त्यातून गरजू रुग्णांना नवजीवन कसे मिळू शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “अवयवदान हे केवळ दान नसून दुसऱ्याला जीवनदान देणारे महान कार्य आहे,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाला जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे, विभागीय संचालक संजय पाटील, शिवराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.

मदन बामणे यांनी आपल्या अनुभवातून अवयवदानामुळे अनेकांना कसा लाभ झाला, याची माहिती दिली आणि समाजातील सर्व घटकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. शिवराज पाटील आणि संजय पाटील यांनीही अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी अवयवदानासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. “अवयवदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात यश आले.

या उपक्रमात आय फाउंडेशनचे पदाधिकारी, बगीचा सुधारणा मंच, सुहास्य परिवार तसेच अपर्णा पाटील, दीपा पाटील, अर्चना कंग्राळकर, शीतल नेसरीकर, वर्दा अंगडी, संजना पाटील आणि इतर सखी सदस्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर्णा पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − 5 =

error: Content is protected !!