शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त श्री भुषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन येऊ घातलेल्या शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसकर यांनी पोलीस आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. बैठकीत तीन दिवस चालणाऱ्या पारंपारिक शिवजयंती उत्सवाच्या विविध बाबींसह मंगळवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी होणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.

पोलीस आयुक्त बोरसे यांनी मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच समाप्त करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दोन चित्ररथांमध्ये अंतर ठेवू नये, ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादा पाळाव्यात आणि उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य उत्सवासाठी पोलिस विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सल्लागार तथा माजी महापौर मालोजी आष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यवाह मदन बामणे आणि शिवराज पाटील उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 5 =

error: Content is protected !!