भाजपच्या दुतोंडी भूमिकेचा कळस; बेळगावकरांनी वेळीच सावध व्हावे

भाजपच्या दुतोंडी भूमिकेचा कळस; बेळगावकरांनी वेळीच सावध व्हावे

बेळगाव सीमा प्रश्न हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर तो मराठी अस्मिता, संस्कृती आणि न्यायाच्या लढ्याशी निगडित भावनिक विषय आहे. अनेक दशकांपासून सीमाभागातील मराठी बांधव लोकशाही मार्गाने न्यायासाठी संघर्ष करत आहेत. हा प्रश्न आजही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना भाजप पक्षाची बेळगावातील भूमिका मात्र गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.

एका बाजूला भाजपचेच खासदार देशाच्या संसदेत उभे राहून बेळगावसह सीमाभागावर अन्याय झाल्याचे स्पष्टपणे सांगतात. महाराष्ट्र आजही सीमाभागासाठी झगडत असल्याचे मान्य करतात. याचा अर्थ सीमा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही, मराठी जनतेच्या भावना जिवंत आहेत आणि या प्रश्नावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे, हे भाजपलाही मान्य आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला बेळगाव महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक काही कानडी संघटनांच्या दबावाखाली “महाजन अहवाल अंतिम आहे” आणि “बेळगाव कर्नाटकाचाच भाग आहे” असा ठराव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेत एक भूमिका आणि बेळगावात दुसरी भूमिका — हा भाजपचा दुतोंडीपणा नाही तर काय?

जर भाजपला खरोखरच मराठी जनतेवर अन्याय झाल्याचे वाटत असेल, तर महानगरपालिकेत मराठी भावनांवर घाव घालणारा ठराव का? संसदेत मराठींच्या बाजूने बोलायचे आणि स्थानिक पातळीवर कानडी संघटनांना खूश करण्यासाठी वेगळी भूमिका घ्यायची, हा निव्वळ राजकीय स्वार्थ आहे.

सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना अशा प्रकारचे ठराव आणणे हे न्यायप्रक्रियेचा आणि मराठी जनतेच्या भावनांचा अवमान करणारे आहे. अंतिम निर्णय संविधानिक प्रक्रियेनुसार संसदेत होणार असताना भाजपकडून स्थानिक पातळीवर वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना मराठी जनतेमध्ये निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व महापालिकेत घडत असताना सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षातील मराठी नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. मराठी अस्मितेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेण्याऐवजी अनेकांनी मौन धारण करणे हे मराठी जनतेसाठी अधिक वेदनादायी ठरत आहे. पक्षनिष्ठेपुढे मराठी अस्मिता दुय्यम ठरत असल्याची भावना आता जनतेत निर्माण झाली आहे.

भाजपने आता आपली भूमिका स्पष्ट करावी. संसदेत मराठींवर अन्याय झाल्याचे मान्य करायचे आणि बेळगावात मात्र महाजन अहवाल अंतिम असल्याचे सांगायचे, हे दोन चेहरे बेळगावची जनता ओळखत आहे. मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल.

सत्ता आज आहे, उद्या नसेल. पण मराठी जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वासघात कायम स्मरणात राहील. बेळगावचा मराठी माणूस शांत आहे, पण तो सर्व पाहत आहे. योग्य वेळ आल्यावर न्याय जनता स्वतः करेल आणि तेव्हा मराठी अस्मितेशी तडजोड करणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + four =

error: Content is protected !!