बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे आजपासून शहरात विविध कार्यक्रमांची उत्साहात सुरुवात झाली. “जय भवानी, जय शिवाजी”, “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांमुळे बेळगाव शिवमय झाले आहे.
छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी ६ वाजता विधीपूर्वक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. तेजोमय शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक भाजप नेते डॉ. रवी पाटील तसेच अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सामूहिक आरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.
दरम्यान, विविध दुर्गांवरून आणलेली पवित्र शिवज्योत शहरात दाखल झाली असून, मावळ्यांच्या आगमनाने वातावरणात अधिकच उत्साह निर्माण झाला आहे. शिवज्योतीच्या स्वागतासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
शिवजयंतीनिमित्त सादर होणाऱ्या चित्ररथ व सजीव देखाव्यांसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून, हे देखावे भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार आहेत. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडावी, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले.
सरचिटणीस जे. बी. शहापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी अंगीकारावा, असे प्रतिपादन केले.
यावेळी अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, प्रसाद पाटील, विनायक बावडेकर, अरुण पाटील, संजय नाईक, मारुती पाटील, विजय कुंटे, भूषण पाटील, राम कुलकर्णी, उमेश शिदोलकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🚩
