बेळगाव : बसवेश्वर जयंतीनिमित्त रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
ही मिरवणूक राणी चन्नम्मा चौक येथून सुरू होऊन काकती वेस मार्ग, शनिवार कूट, गणपती गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज मैदानापर्यंत जाणार आहे.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 4.00 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत संबंधित मार्गांवर वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खानापूरकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, संगोळी रायण्णा चौक, एस.पी. ऑफिस रोड, कृष्णदेवराय चौक, वाय- जंक्शन, सदाशिव नगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्या नगर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, ग्लोब थिएटर सर्कल मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे.
तसेच काँग्रेस रोड मार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच गोवा रोड रेल्वे फ्लायओव्हर मार्गे येणाऱ्या वाहनांनाही पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी रस्त्यांची पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून काही ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवली जाईल.
महत्त्वाचे म्हणजे, सायंकाळी 4 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
राणी चन्नम्मा चौक ते कॉलेज रोड दरम्यानच्या सर्व मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची पार्किंग देखील प्रतिबंधित करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
