प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्री ज्योतिबा व काळभैरव देवांना अभिषेक!

प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्री ज्योतिबा व काळभैरव देवांना अभिषेक!

बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाचा कोल्हापूर-सातारा जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण धार्मिक दौरा; छत्रपती उदयनराजे महाराजांची सदिच्छा भेट, पाडळी गावात तुतारीच्या निनादात भव्य स्वागत

बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर, देवदादा मठ परिसरातील शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला सुरुवात करण्याच्या मंगल संकल्पाने श्री देव दादा सासनकाठी मंडळ, चव्हाट गल्ली आणि बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या वतीने सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा डोंगरावर विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्री ज्योतिबा देव आणि काळभैरव देवांना विधिवत अभिषेक घालून पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य निर्विघ्नपणे आणि धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण व्हावे, कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच देवतांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत, या श्रद्धेने देवाच्या चरणी राखणीचा नारळ ठेवण्यात आला.

सासनकाठीचे पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडले. यावेळी ज्योतिबा डोंगरावरील गुरव मंडळीही उपस्थित होती. मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य यशस्वी व्हावे, अशी सामूहिक प्रार्थना सासनकाठी सेवेकरी, भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि उपस्थित भाविकांनी केली.

या कार्यक्रमाला मंडळाचे कार्याध्यक्ष नागेंद्र नाईक, खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर, सचिव नामदेव नाईक, उपखजिनदार परेशराम किल्लेकर, उपसचिव ज्योतिबा धामणेकर, श्रीनाथ पवार, ज्योतिबा उर्फ सोनू किल्लेकर, गिरीश उर्फ भाऊ पाटील, सुमित तारीहाळ, विश्वजीत हसबे, सुरेश तारीहाळ, मंथन कामुले, प्रशांत कुढे, मनोज काकतकर यांच्यासह सासनकाठी सेवेकरी व भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मंदिर जीर्णोद्धारासाठी कोल्हापूर-सातारा जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण दौरा

शिवबसवनगर येथील प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व जपण्याचा मंडळाचा मानस आहे. मंदिराचे मूळ स्वरूप आणि पारंपरिक वास्तुशैली अबाधित ठेवून जीर्णोद्धाराचे काम व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील विविध प्राचीन मंदिरांना भेटी देण्याचा अभ्यासपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या दौऱ्यात ऐतिहासिक मंदिरांची रचना, वास्तुशैली, पारंपरिक बांधकाम पद्धती, दगडी बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मंदिर उभारणारे पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अवलंबण्यात येणाऱ्या धार्मिक आणि पारंपरिक पद्धतींचाही अभ्यास केला जात आहे.

या अभ्यासातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग बेळगाव येथील प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात येणार आहे.

छत्रपती उदयनराजे महाराजांची सदिच्छा भेट; बेळगावच्या देवस्थानाची माहिती

सातारा दौऱ्यादरम्यान बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी आणि ज्योतिर्लिंग देवस्थानच्या प्रतिनिधींनी छत्रपती उदयनराजे महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी देवस्थानच्या वतीने महाराजांना देवाचे उपरणे (शाल) आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठीचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास, धार्मिक परंपरा, सासनकाठीचे महत्त्व आणि श्री ज्योतिर्लिंग देवस्थानविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

देवस्थानच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची माहिती जाणून घेतल्यानंतर महाराजांनी मंडळाच्या प्रतिनिधींशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी बेळगावला भेट देऊन देवस्थानचे दर्शन घ्यावे, अशी आग्रहपूर्वक विनंती करण्यात आली. त्यावर महाराजांनी लवकरच बेळगावला भेट देण्याचे आश्वासन दिले.

या सदिच्छा भेटीदरम्यान ओंकारराजे भोसले आणि करणसिंग हंबीरराव मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले. या भेटीमुळे बेळगावच्या ऐतिहासिक देवस्थानची परंपरा आणि सातारा येथील राजघराण्याशी असलेला सांस्कृतिक व धार्मिक संवाद अधिक दृढ झाला.

पाडळी गावात तुतारीच्या निनादात सासनकाठी मंडळाचे भव्य स्वागत

बेळगावच्या ज्योतिर्लिंग देवस्थानच्या मंडळींच्या सातारा दौऱ्याची माहिती मिळताच पाडळी गावचे विशाल ढाणे यांनी मंडळाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून पाडळी गावाला भेट देण्याचे सस्नेह आमंत्रण दिले. हे आमंत्रण स्वीकारून दौऱ्याच्या नियोजनात बदल करत मंडळाच्या प्रतिनिधींनी पाडळी गावाला भेट दिली.

श्री ज्योतिर्लिंग ट्रस्ट, पाडळी, जिल्हा सातारा यांच्या वतीने बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री ज्योतिबा डोंगरावरील यात्रेदरम्यान क्रमांक एकची मानाची सासनकाठी म्हणून ओळख असलेल्या आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पाडळीच्या सासनकाठीच्या वतीने बेळगावच्या मंडळींचे तुतारीच्या निनादात आणि मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले.

यानंतर पाडळी गावातील विविध देवस्थानांना भेटी देण्यात आल्या. या भेटीदरम्यान देवस्थानांचा इतिहास, धार्मिक परंपरा, सासनकाठीचे महत्त्व, यात्रा उत्सव, देवस्थानची कार्यपद्धती आणि ऐतिहासिक वारसा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

दोन्ही देवस्थानांच्या प्रतिनिधींमध्ये आपुलकीचा संवाद झाला. बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठीची परंपरा आणि पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचा इतिहास यांची माहिती एकमेकांना देण्यात आली. तसेच देवस्थान व्यवस्थापन, धार्मिक परंपरा आणि भविष्यातील सहकार्याबाबतही चर्चा करण्यात आली.

दौऱ्याच्या समारोपप्रसंगी पाडळी ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बेळगावच्या श्री देव दादा सासनकाठी मंडळाच्या प्रतिनिधींचा पारंपरिक भगवा फेटा बांधून आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पाडळी ग्रामस्थांनी केलेल्या जिव्हाळ्याच्या स्वागताबद्दल मंडळाच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

ऐतिहासिक वारसा जपत जीर्णोद्धार करण्याचा निर्धार

शिवबसवनगर येथील प्राचीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे मूळ स्वरूप, ऐतिहासिक वास्तूवैभव, धार्मिक महत्त्व आणि पारंपरिक स्थापत्यशैली जतन करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील प्राचीन मंदिरांची पाहणी करून अनुभवी कारागीर, शिल्पकार आणि पारंपरिक बांधकाम पद्धतींची माहिती संकलित केली जात आहे.

या दौऱ्यात विविध देवस्थानांच्या भेटी, छत्रपती उदयनराजे महाराजांची सदिच्छा भेट आणि पाडळी ग्रामस्थांनी केलेले पारंपरिक स्वागत यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे.

श्रद्धा, परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि अभ्यासपूर्ण नियोजन यांचा संगम साधत हाती घेतलेले प्राचीन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य श्री ज्योतिबा आणि काळभैरव देवांच्या आशीर्वादाने यशस्वी व्हावे, तसेच विविध देवस्थानांमधील धार्मिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी भावना यावेळी मंडळाच्या पदाधिकारी आणि भक्तांनी व्यक्त केली.

बेधडक बेळगाव

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + fourteen =

error: Content is protected !!