बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे गेल्या दहा वर्षांपासून संस्थेला बहुमोल सहकार्य करणाऱ्या डॉ. नीता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. नीता देशपांडे यांनी भविष्यातही सोसायटीला आपले सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात सेट्रा केअरच्या वतीने डॉ. शाहनाज पटेल यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास घ्यावयाची काळजी, प्राथमिक उपाययोजना आणि उपचार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले.
यावेळी उपाध्यक्ष के. एल. मजूकर व शोभा हतरकी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, तसेच एन. जी. गाडगीळ (सीए), खजिनदार विनिता बाडगी, नूतन कार्यकारिणी सदस्य उल्हास पानसे व बाळकृष्ण बिर्जे, माजी उपाध्यक्ष जवाहर देसाई आणि डॉ. शाहनाज पटेल यांचाही अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, विठ्ठल पोलो, वनिता जोशी, स्नेहलता जुवळी, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे आणि प्रकाश कुडतरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले, तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.
