बेळगाव : धामणे (एस) तिलारी परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय दंतचिकित्सकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मोहम्मद अमीरशाह (रा. बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अमीरशाह हे मित्रांसोबत धामणे येथे फिरायला गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी HERF (Humanitarian Emergency Response Force) तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. HERF टीममध्ये बसवराज हिरेमठ यांच्यासह अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, मुदस्सर तर्णीकर आणि राजू तक्केकर यांचा समावेश होता.
यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस, एसडीआरएफ आणि वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून शोधमोहीम राबविण्यात आली. उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अखेर संयुक्त बचाव कार्यात मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
