बेळगाव : वडगाव मुख्य रस्त्यावरील नाझर कॅम्प परिसरातील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन टाकीची दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन व्यवस्था सुरळीत करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी विसर्जन टाकीची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती, सुरक्षितता आणि भाविकांच्या सोयीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान हजारो भाविक या टाकीचा वापर करणार असल्याने प्रशासनाने तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे पूर्ण करून विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पाहणीवेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाचे श्री रामाकांत कोंडुसकर, विकास काळघटगी, मनोहर हळगेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, अमोल देसाई, संजय शिंदे, राजेंद्र बिरजे, सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील, सुनील बोकडे, राजेंद्र बैलूर, भरत नागरोळी, उदय पाटील आणि गुणवंत पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी गणेशोत्सवापूर्वी विसर्जन टाकीची दुरुस्ती करून भाविकांसाठी सुरक्षित व सुरळीत व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आवाहन बेळगाव महानगरपालिकेला केले.
