आयटी क्षेत्रातील नोकरकपातीवर तातडीने हस्तक्षेप करा; अमित देसाई यांचे शरद पवारांना निवेदन

आयटी क्षेत्रातील नोकरकपातीवर तातडीने हस्तक्षेप करा; अमित देसाई यांचे शरद पवारांना निवेदन

देशभरातील आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात वाढत चाललेल्या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) इंजिनिअर सेल महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश प्रमुख अमित शिवाजीराव देसाई यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. यावेळी विक्रम पाटील हे देखील उपस्थित होते.

अमित देसाई यांनी दिलेल्या निवेदनात आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात येत असल्याने अनेक कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक असुरक्षितता वाढत असून सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात कंपन्यांनी कामगार कायद्यांचे काटेकोर पालन करावे, कर्मचाऱ्यांना योग्य सेव्हरन्स पॅकेज द्यावे आणि नोकरी कमी करताना कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना पुरेशी पूर्वसूचना न देता कामावरून कमी करत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय सध्याच्या रोजगार बाजारपेठेतील मंदीमुळे नवीन नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या असून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार मिळवणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांना सरकारने विशेष आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

सेव्हरन्स पॅकेजवर पूर्ण करमाफी देण्याची मागणीही अमित देसाई यांनी केली आहे. आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देत असताना संकटाच्या काळात सरकारने त्यांना आर्थिक दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमित देसाई यांनी शरद पवार यांना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडे हा विषय गांभीर्याने मांडून प्रभावित कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + fourteen =

error: Content is protected !!