अभिनेता सुदेश बेरी यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट; आजींसोबत घालवला आनंदाचा वेळ

अभिनेता सुदेश बेरी यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट; आजींसोबत घालवला आनंदाचा वेळ

बेळगाव : प्रसिद्ध अभिनेते सुदेश बेरी यांनी बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रम (Second Childhood) येथे भेट देत ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे वृद्धाश्रमातील वातावरण आनंदी आणि उत्साहपूर्ण झाले.

आश्रमात आगमन झाल्यानंतर अॅलन विजय मोरे यांनी सुदेश बेरी यांचे स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष स्वागत समारंभात वृद्धाश्रमातील आजींनी पारंपरिक पद्धतीने आरती करून त्यांचे स्वागत केले.

यानंतर शांताई वृद्धाश्रमाचे संचालक वसंत बाळिगा यांच्या हस्ते सुदेश बेरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या टीममधील सदस्यांचे मारिया विजय मोरे आणि चेरिल मोरे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान सुदेश बेरी यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आपल्या काही लोकप्रिय चित्रपटांमधील संवाद सादर केले. त्यांच्या संवादांवर आजींसह सर्व रहिवाशांनी उत्स्फूर्त दाद दिली.

सुदेश बेरी यांनी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधत त्यांच्यासोबत आपुलकीचे क्षण घालवले. त्यामुळे हा दिवस रहिवाशांसाठी विशेष आणि संस्मरणीय ठरला.

विशेष म्हणजे, भेटीच्या शेवटी सुदेश बेरी यांनी शांताई वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांसोबत भोजन केले. ज्येष्ठ नागरिकांसोबत एकत्र जेवण करत त्यांनी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेतले.

सुदेश बेरी यांच्या या भेटीमुळे शांताई वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. हास्य, संवाद आणि आपुलकीने भरलेला हा दिवस सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + 4 =

error: Content is protected !!