सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रताप सरनाईक यांना निवेदन

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रताप सरनाईक यांना निवेदन

मराठी शाळा बंद करणे, गुणपत्रिकेतून मराठी विषय वगळणे आणि शिक्षक भरतीतील प्रश्नांकडे लक्ष वेधत दिनेश मुदाळे यांची मागणी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या न्याय्य आणि ठोस सोडवणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी पाठपुरावा करावा, तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि भाषिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिनेश वैजनाथ मुदाळे यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप बाबुराव सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह ८६५ गावांतील मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सीमाभागातील मराठी शाळा बंद करून त्या ठिकाणी कन्नड शाळा सुरू करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतून मराठी विषय वगळण्यात येणे, तसेच मराठी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा केवळ भूभागाचा प्रश्न नसून सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या अस्मितेशी, सांस्कृतिक ओळखीशी आणि न्याय्य हक्कांशी निगडित असल्याचे मुदाळे यांनी म्हटले आहे. अनेक दशकांपासून हा प्रश्न प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातील खटला सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेनेही सीमाप्रश्नासंदर्भात सर्वानुमते ठराव मंजूर करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे, असे निवेदनात नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्यासाठी राज्य शासनाने प्रभावी कायदेशीर पाठपुरावा करावा, सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व भाषिक हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, महाराष्ट्र विधानसभेत आणि संबंधित मंचांवर हा प्रश्न नियमितपणे उपस्थित करावा, तसेच सीमाभागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी मंडळे पाठवून प्रत्यक्ष संवाद साधावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकसंघ भूमिका घ्यावी आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा दिनेश वैजनाथ मुदाळे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + one =

error: Content is protected !!