संजीविनी फाउंडेशनमध्ये भक्तिमय वातावरणात कार्तिकोत्सव उत्साहात साजरा

संजीविनी फाउंडेशनमध्ये भक्तिमय वातावरणात कार्तिकोत्सव उत्साहात साजरा

१,१११ दिव्यांच्या प्रकाशाने उजळला संजीविनी केअर सेंटरचा परिसर; तुळशी विवाह, पूजा-अर्चा आणि भजन-कीर्तनाने वातावरण भक्तिमय

बेळगाव : संजीविनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्तिकोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संजीविनी केअर सेंटरच्या परिसरात १,१११ दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि वातावरण भक्तिमय झाले.

या दीपोत्सवाचा शुभारंभ बँक ऑफ महाराष्ट्रच्या हुबळी विभागीय कार्यालयाचे सुनील शिरगुप्पी, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक संतोष कुमार कनकला आणि कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या माधुरी कुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी कार्तिकोत्सवाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले. उपस्थित मान्यवरांचे शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

दुपारच्या सत्रात पद्मावती अम्मा यांची विधिवत पूजा करण्यात आली. यामध्ये कलशपूजन, पादुकाभिषेक तसेच भजन आणि संकीर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

सायंकाळी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्त परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर १,१११ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर, संस्थेतील कर्मचारी आणि केअर सेंटरमधील रहिवाशांनी स्वतः दिवे प्रज्वलित करून उत्सवात सहभाग घेतला. दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला.

या कार्यक्रमाला संजीविनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे, संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, आर्किटेक्ट आर. एम. चौगुले, सल्लागार सदस्य संजय पाटील, सुनील भोसले, सुनील पवार यांच्यासह संस्थेचा कर्मचारीवृंद आणि केअर सेंटरमधील सर्व रहिवासी उपस्थित होते.

या उत्सवामुळे केअर सेंटरमधील रहिवाशांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आनंद घेण्याची संधी मिळाली. दैनंदिन जीवनातील एकसुरीपणा दूर करून आनंद, भक्ती, आपुलकी आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा कार्तिकोत्सव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × three =

error: Content is protected !!