गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्य : रमाकांत कोंडुसकर

गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्य : रमाकांत कोंडुसकर

राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती समिधा बिरजेचा रयत गल्लीवासीयांतर्फे भव्य सत्कार

बेळगाव : कुस्ती क्षेत्रात यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. बेळगावमधील अनेक गुणवान खेळाडू कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. अशा गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

बेंगळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत ४० किलो वजनी गटात वडगाव येथील रयत गल्लीची समिधा भोमेश बिरजे हिने सुवर्णपदक पटकाविले. तिच्या या यशाबद्दल रयत गल्लीतील शाळेत नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला रमाकांत कोंडुसकर यांच्यासह मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिरजे, कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी, गल्लीतील ज्येष्ठ पंच नारायण माळवी, शेतकरी नेते राजू मर्वे, निवृत्त क्रीडा संयोजक विलास घाडी, आनंदा बिरजे, विलास बिरजे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक विजेती समिधा बिरजे आणि तिचे कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समिधाचे वडील भोमेश बिरजे तसेच कुस्ती स्पर्धेतील अन्य विजेती मनस्वी जायणाचे हिचे वडील यल्लाप्पा जायणाचे यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, तरुण पिढीने व्यायामाची आवड जोपासली पाहिजे. व्यायाम आणि खेळामुळे वाईट व्यसनांपासून दूर राहता येते. गुणवंत खेळाडूंना समाजाने प्रोत्साहन दिल्यास ते भविष्यात आणखी मोठे यश संपादन करू शकतात.

गोपाळ बिरजे यांनी सत्कारामुळे खेळाडूंना भावी वाटचालीसाठी प्रेरणा मिळते, असे सांगितले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उज्ज्वल भवितव्य घडविता येते, असेही त्यांनी नमूद केले. विलास घाडी यांनीही यावेळी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात रयत गल्ली बाल भजनी मंडळ, वारकरी महिला संघ, महिला मंडळ तसेच दिगंबर तारीहाळकर, चांगुणा धुमाळे, श्रीधर खन्नुकर आदींनी समिधाला पुष्पगुच्छ आणि रोख पारितोषिक देऊन गौरविले. समिधाला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले, तर संदीप खन्नुकर यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

error: Content is protected !!