बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल वाढावा आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत, या उद्देशाने शिक्षण खात्याच्या वतीने विविध विषयांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मराठी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये गणित विषयाच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर होते. गणित विषयाचे ज्येष्ठ शिक्षक डी. एस. मुतकेकर यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बेळगाव बीआरसीचे आय. डी. हिरेमठ, सीआरपी हिरेमठ आणि शंकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात रिसोर्स पर्सन संजय मजुकर (मुख्याध्यापक, शिवाजी विद्यालय) यांनी शिक्षकांना गणित विषयाच्या अध्यापनासंदर्भात मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कोमल गावडे, तर तिसऱ्या सत्रात सातेरी वड्डेबैलकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले, तर नोडल अधिकारी कामत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
