बेळगाव : बेळगाव विभागातून २०२६ सालचा प्रतिष्ठित ‘सहकार रत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. दिगंबर एस. पवार यांचा समस्त चव्हाट गल्ली नागरिकांच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. चव्हाट गल्लीतील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच बाबुराव लक्ष्मणराव मोहिते होते. व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन शेखर हंडे, व्हाईस चेअरमन विनोद हंगिर्गेकर, मल्लेश चौगुले, माजी नगरसेवक पुंडलिक परीट, बँकेचे संचालक मोहन चौगुले व विश्वजीत हसबे यांच्यासह गल्लीतील ज्येष्ठ पंचमंडळी उपस्थित होती.
प्रारंभी मराठा बँकेचे संचालक विश्वजीत हसबे यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन शेखर हंडे यांनी दिगंबर पवार यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी चव्हाट गल्लीच्या शेकडो वर्षांच्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत बेळगावच्या विकासात गल्लीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. तर मल्लेश चौगुले यांनी चव्हाट गल्ली आणि बहुजन समाजातील घट्ट नात्याचा उल्लेख केला.
यावेळी अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती दिगंबर पवार आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानाचा भगवा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना दिगंबर पवार यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. मिळालेला पुरस्कार हा आपल्याला सहकार्य करणाऱ्या असंख्य लोकांना समर्पित असल्याचे सांगत, या पुरस्कारावर न थांबता भविष्यातही समाज, बेळगाव शहर आणि विविध संस्थांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
याच कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रात राज्य पातळीवर नियुक्ती झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांचा, तसेच चव्हाट गल्ली आणि मराठा बँकेतील ऋणानुबंध लक्षात घेऊन चेअरमन शेखर हंडे व व्हाईस चेअरमन विनोद हंगिर्गेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, श्री ज्योतिबा देवस्थान व श्री देव दादा सासनकाठी, सिद्धकला भजनी मंडळ, शिवशंभू ढोल पथक, श्री चव्हाटा युवक संघटना, मोरया ग्रुप, क्रांतिवीर रिक्षा स्टॅन्ड मित्रपरिवार, कल्याण चौक गणेश मंदिर संघटना, समस्त पवार कुटुंब, मराठा बँक संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग तसेच मित्रपरिवाराच्या वतीने दिगंबर पवार यांचा स्वतंत्रपणे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शेवटी श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर यांनी उपस्थित मान्यवर, विविध मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले.
