बेळगाव : कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत साई शिवाजी गावडे याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बेळगाव येथे पार पडलेल्या मिशन ऑलिम्पिक कर्नाटक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने सुवर्ण पदक पटकावले असून त्याची उज्जैन मध्यप्रदेश येथे होणाऱ्या अंडर-11 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
साई शिवाजी गावडे हा सरकारी मराठी प्राथमिक शाळा मुचंडी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. लहान वयातच कुस्ती क्षेत्रात त्याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवत त्याने आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
साईला शाळेचे मुख्याध्यापक पी. एन. खेमळे तसेच शिक्षकवृंद आणि शाळा विकास व व्यवस्थापन समितीच्या (SDMC) सदस्यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच त्याचे मामा पैलवान अतुल शिरोळे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असून त्यांच्या मार्गदर्शनाचा साईला लाभ होत आहे.
साईच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून आगामी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
